(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील टुनकी-सोनाळा मार्गावर केळीने भरलेले आयशर वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जामोद रस्त्याकडून केळी घेऊन निघालेल्या एम.एच ४८ ए.वाय ४८१५ क्रमांकाच्या आयशर वाहनाचा ताबा चालकाच्या हातून सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. या अपघातात निलेश तेजराव चव्हाण वय ४० व बाळू रायबोले वय ४२ या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून गुणवंत रामदास चव्हाण वय ३५, हरीश रामदास चव्हाण वय २२, वनदेवराव जगनराव वानखडे वय ४२, शाहीद खा मुनदर खा पठाण वय ३८, ईद्रीस खा इब्राहिम खान वय ४० सर्व जखमी अंजनगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर काही काळ तेथे मोठी नागरिकांची गर्दी झाली होती. तसेच ट्राफिक जामची स्थितीही निर्माण झाली होती. पोलीसांनी तातडीने वाहतुक सुरळीत केली. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत.