(मतीन शेख)
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका काही दिवस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मतदार यादी अंतिम करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाकडून वाढवण्यात आल्यानंतर या चर्चा अधिक जोर धरत आहेत.
आधी २७ ऑक्टोबरपर्यंत मतदार यादी अंतिम करण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव ही प्रक्रिया आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकांचा पुढील कार्यक्रम काहीसा उशिराने जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन कार्यक्रमानुसार ३ नोव्हेंबरपर्यंतच्या मतदार याद्या अधिप्रमाणित केल्या जातील. तर १२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी आणि केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समीप आल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच मतदार यादी प्रक्रियेमुळे निवडणुका काही काळ पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.