(मतीन शेख)
बुलढाणा: अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात संविधान संरक्षण समितीने संघर्षाची भूमिका घेतली असून, या निर्णयाच्या निषेधार्थ दि.६ जुलै रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयावर विराट महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात संग्रामपूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार वरवट बकाल येथे संविधान संरक्षण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत शासनाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर सखोल चर्चा करण्यात आली. हा निर्णय अनुसूचित जातींच्या आरक्षण व्यवस्थेवर परिणाम करणारा असल्याचा आरोप उपस्थितांनी केला. तसेच हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि आरक्षण व्यवस्थेची मूळ रचना कायम ठेवण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यानुसार तालुकाभरातील संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक संघटना व समाजबांधवांना एकत्रित करून तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीस संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध गावांतील संविधानप्रेमी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी मोर्चासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

