(मतीन शेख)
बुलढाणा : मागील तीन दिवसापूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. तेव्हा पासून महायुती, महाविकास आघाडी, वंचित तसेच परिवर्तन महाशक्ती यांच्यात कोण बाजी मारणार यांच्या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र संध्याकाळी मतदान झाल्यावर महायुती उमेदवार डॉ.संजय कुटे व महाविकास आघाडी उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांच्यामध्ये जोरदार टक्कर होणार असल्याची चर्चा मतदार संघात सुरु होती. दोन दिवस जळगाव जामोद मतदार संघात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले होते. मात्र २३ नोव्हेंबर रोजी निकालाच्या दिवशी सर्व चर्चा बंद झाल्या. सकाळी ९ वाजता पासून महायुती उमेदवार डॉ. संजय कुटे हे जळगाव जामोद मतदार संघातील १ फेरी वगळता उरलेल्या २२ फेरीत आघाडीवर होते. त्यांनी शेवट पर्यंत आपली आघाडी टिकवून ठेवली व शेवटी १८७७१ मतांनी विजय मिळविला. यंदाची निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी अस्तित्वाची होती. २०१९ मध्ये सुद्धा स्वाती वाकेकर यांचा पराभव झाला होता. तरी सुद्धा हि संधी पुन्हा डॉ. स्वाती वाकेकर यांना देण्यात आली होती. परंतु त्या मध्ये सुद्धा त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. भाजपने जळगाव जामोद मतदार संघात काँग्रेसचा पराभव करत पाचव्यांदा महाविजय मिळविला आहे. यात डॉ.संजय कुटे विक्रमी मतांनी निवडून विजयी झाले असून हा विजय मतदार संघातील मातृशक्ती आणि मायबाप जनतेचा असल्याची पहिली प्रतिक्रिया निवडणूक जिंकल्यावर डॉ.संजय कुटे यांनी दिली. जळगाव जामोद मतदार संघात ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत “बाप तो बाप रहेगा” या गाण्यावर महायुतीचा जल्लोष सुरु आहे.