(मतीन शेख)
संग्रामपूर : हिंगणा ते कवठळ मार्गावर भोन फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात ३८ वर्षीय दीपक प्रल्हाद अढाळे यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेल्या तुळसाबाई भिकाजी भामद्रे या महिला जखमी झाल्या. दरम्यान, अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यास काही जणांनी अडथळा निर्माण केल्याने उपचारास विलंब झाल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिपक प्रल्हाद अढाळे रा.हिंगणा कवठळ, नंदकिशोर सदाशिव फाळके, अनंता जगन्नाथ तराळे, जगन्नाथ तराळे रा.भोन जुने ता.संग्रामपुर, अभिलाश मुकींदा क्षिरसागर, संदिप रामराव भामद्रे दोन्ही रा.कवठळ ता. संग्रामपुर अशी आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी १२ वाजताच्या सुमारास हिंगणा-कवठळ मार्गावरील भोन फाट्याजवळ दीपक अढाळे यांच्या दुचाकीचा अपघात झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने वाहन घसरून पडल्याची माहिती आहे. या अपघातात दीपक अढाळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तुळसाबाई भामद्रे जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच दिपक यांचे लहान भाऊ विलास अढाळे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी भाऊ आणि महिलेला उपचारासाठी दुचाकीवरून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी जखमींना दवाखान्यात नेऊ नका, असे सांगत त्यांना दुचाकीवरून खाली उतरविल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. त्यामुळे जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यास विलंब झाला. सुमारे एक तासानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दीपक अढाळे यांना मृत घोषित केले, तर तुळसाबाई भामद्रे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. या घटनेप्रकरणी विलास प्रल्हाद अढाळे यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ३९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), १२५(अ), ३(५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात आणि जखमींना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळा आणल्याच्या आरोपांची नोंद पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ अनिल सुशिर करीत आहेत.

