(मतीन शेख)
संग्रामपूर: बावनबीर येथील प्रगतिशील युवा शेतकरी, शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे कलीम काजी वय ४७ यांचे मंगळवारी अकोला येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने बावनबीर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. कलीम काजी यांनी शेती क्षेत्रात प्रगतिशील शेतकरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ते नेहमीच सक्रिय राहिले. तसेच समाजातील निराधार, दिव्यांग आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असत. कोणताही स्वार्थ न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या अंत्यविधीला बावनबीरसह परिसरातील सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. अंत्यविधीला झालेली प्रचंड गर्दी त्यांच्या सामाजिक कार्याची आणि जनमानसातील लोकप्रियतेची साक्ष देणारी ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह शेतकरी संघटना आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

