Wednesday, November 18, 2026
HomeUncategorizedशहाणूरमध्ये गांजाची शेती फुलवली; पोलिसांच्या छाप्यात ३४ किलो ६० ग्रॅम गांजा जप्त!...

शहाणूरमध्ये गांजाची शेती फुलवली; पोलिसांच्या छाप्यात ३४ किलो ६० ग्रॅम गांजा जप्त! अकोट ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

(मतीन शेख)

 

 

अकोट: अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरुद्ध अकोला जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. अकोट तालुक्यातील शहाणूर येथे घराच्या आवारात तुरीच्या झाडांमध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार अकोट ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला. या धडक कारवाईत गांजाची १२ लहान-मोठी झाडे जप्त करण्यात आली असून, त्यातून मिळालेला ३४ किलो ६० ग्रॅम गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल ६ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक कार्यरत असताना शहाणूर येथील सचिन लक्ष्मण जांभळे याने आपल्या घराच्या मागील बाजूस तुरीच्या झाडांमध्ये गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या परवानगीने पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांना गांजाची एकूण १२ झाडे आढळून आली. या झाडांना पाने, फुले, बिया, कळ्या, खोड व मुळांसह एकूण ३४ किलो ६० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष हा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी सचिन लक्ष्मण जांभळे (वय ४०, रा. शहाणूर, ता. अकोट) आणि अनिललाल लालजी धांडेकर (वय ३९, रा. सोमठाणा, ता. चिखलदरा, ह.मु. शहाणूर, ता. अकोट) या दोघांविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अकोट ग्रामीण पोलिसांचे पथक सहभागी

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे, अकोट विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक निखिल पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिष सोनवणे, राजेश्वर सोनवणे, सागर नागो, गोपाल जाधव, विठ्ठल चव्हाण, शैलेश जाधव, सचिन कुलट, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उमा आसरे, पोलीस कॉन्स्टेबल रितेश जायभाये, अमोल म्हस्के, राजेश माळेकर व शुभम लंगोटे यांनी सहभाग घेतला.

 

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

 

अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा अन्य अवैध व्यवहारांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन अकोला जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!