(मतीन शेख)
अकोला : शहरात पोळ्यानिमित्त बैलांची पूजा आणि सजावट सुरू असताना महापालिकेच्या कोंडवाड्यात बंदिस्त असलेल्या गोवंशांसोबत पोळा साजरा करण्यासाठी पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी थेट कोंडवाडा गाठला. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी गोवंशांचे पूजन करून त्यांना पुरणपोळी व चारा दिला. यावेळी कोंडवाड्यातील गोवंशांच्या परिस्थितीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. डाबकी रोड, श्रीवास्तव चौक परिसरातील महापालिकेच्या कोंडवाड्यात रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गोवंशांना पकडून ठेवण्यात आले आहे. पोळ्याच्या दिवशी या गोवंशांचीही पूजा करून त्यांना चारा दिला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाकडून त्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप आमदार पठाण यांनी केला. गोवंशांच्या नावाने राजकीय भूमिका मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या संगोपनाकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे आमदार पठाण यांनी सांगितले. ‘गौमाता’च्या नावाने केवळ घोषणा आणि राजकारण करण्यापेक्षा मुक्या जीवांची प्रत्यक्ष सेवा करणे महत्त्वाचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
कोंडवाड्यातच पोळ्याचा सण
पोळ्याच्या पार्श्वभूमीवर आ. पठाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह कोंडवाड्यात जाऊन गोवंशांचे पूजन केले. त्यांना पुरणपोळी व चारा खाऊ घालण्यात आला. यानंतर गोवंशांची कोंडवाड्यातून सुटकाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमातून मुक्या जीवांप्रती संवेदनशीलता जपण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘सत्तेच्या राजकारणापेक्षा मुक्या जीवांची काळजी महत्त्वाची आहे. गोवंशांबद्दल खरोखर आस्था असेल तर ती कृतीतून दिसली पाहिजे,’ असे आमदार पठाण यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक आकाश कवडे, राहुल सारवान, अभिजित तवर, अंकुश तायडे, विजय जामनिक, राम कोकाटे, ऋषिकेश जामोदे, अंकुश भेंडेकर, अजय खंडारे, साहिल तेलगोटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.