Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedआमदार साजिद खान पठाण यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन...

आमदार साजिद खान पठाण यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशी आणि वाय-प्लस दर्जाची सुरक्षेची मागणी

(मतीन शेख)

 

अकोला: जिल्ह्यातील पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना पुन्हा एकदा दूरध्वनीद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा समोर आला आहे. यापूर्वीही त्यांना अशाच प्रकारची धमकी मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. धमकी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या शुभम लोणकर याच्या नावाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाचा उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि सर्वंकष तपास करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात आमदार पठाण यांनी वारंवार आपल्यालाच अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या धमक्यांमागे स्थानिक स्तरावरील कोणती व्यक्ती, गट किंवा अन्य सूत्रधार कार्यरत आहेत का, याचाही तपास व्हावा. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी त्यांनी मागणी केली. यासोबतच, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य शासनाने तातडीने वाय-प्लस दर्जाची सुरक्षा आणि एस्कॉर्ट वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक आणि संबंधित पोलीस अधीक्षकांना आवश्यक त्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, आमदार साजिद खान पठाण यांना अल्पावधीतच दुसऱ्यांदा धमकी मिळाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. त्यामुळे या धमक्यांमागील खरे सूत्रधार कोण, याचा उलगडा करण्यासाठी तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, अकोल्यासह राज्यभर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!