(मतीन शेख)
बुलढाणा : शिक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना संग्रामपूर तालुक्यात घडली आहे. क्लाससाठी शेगावला जाणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून बसमध्ये तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनी सोमवार दि.८ जुन रोजी सकाळी शेगाव येथे खासगी शिकवणीसाठी जात होती. याचदरम्यान आरोपींनी संगनमत करून तिचा गावापासून ते शेगाव पर्यंत मोटारसायकल, ऑटो आणि बसमधून पाठलाग केला. प्रवासादरम्यान मुख्य आरोपी प्रथमेश सुरेश महल्ले रा. शेलू, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला याने बसमध्ये विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर इतर तिन्ही आरोपींनी त्याला मदत केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी प्रथमेश महल्ले, सौरभ हटकर रा. भेंडी सूत्र ता. बार्शीटाकळी, कृष्णा संतोष गावंडे रा.भेंडगाव ता. बार्शीटाकळी आणि शिवा हटकर रा.बावनबीर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४,७५,७८,४९, ३(५) बिएनएस सह कलम ८,१२,१७ पोक्सो २०१२ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार मिळताच सोनाळा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी क्रमांक १ आणि ३ यांना ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांना त्रास देण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.