(मतीन शेख)
संग्रामपूर: महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी बावनबीर मंडळात दि. ७ मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्राम पंचायत बावनबीर येथे पूर्वतयारी बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. मंडळातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, पोलिस पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविका, बीएलओ, बचत गट प्रतिनिधी तसेच इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शिबिरात महसूल विषयक अर्ज स्वीकृती, तक्रार निवारण आणि प्रलंबित कामांचा आढावा घेऊन तत्काळ निर्णय देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस नायब तहसीलदार राहुल वसावे, सरपंच गजानन मनसुटे, पोलिस पाटील रेणुका खंडारे, मंडळ अधिकारी रविंद्र बोराखडे, ग्राम महसूल अधिकारी विश्वनाथ सुदेवाड, अंगणवाडी सेविका पुष्पलता पाटील, जयश्री बुंदे, ग्रामपंचायत लिपिक शैलेश शिरसाट, रोजगार सेवक देविदास शिंदे, वसिम काजी आदी उपस्थित होते.

