(मतीन शेख)
बुलढाणा : होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले डॉ.प्रविण जनार्धन पाटील यांनी १५ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा समन्वयक पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या घडामोडीमुळे जळगाव जामोद मतदारसंघात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
डॉ.प्रविण पाटील यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने त्यांना जळगाव जामोद मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
राजीनाम्याबाबतची माहिती डॉ.पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून, हा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, पक्षातील स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद व संघटनात्मक असंतोष यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
डॉ.प्रविण पाटील यांच्या या सोडचिठ्ठी नंतर ते पुढे कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

