Monday, November 23, 2026
HomeUncategorizedबावनबीर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! रद्दी पेपरवर दिली खिचडी! कारवाईची...

बावनबीर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! रद्दी पेपरवर दिली खिचडी! कारवाईची मागणी 

 

(मतीन शेख)

 

बुलढाणा: जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. शाळेतील चिमुकल्यांना चक्क रद्दी पेपरवर खिचडी देण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून शिक्षण विभागातील निष्काळजीपणाचा हा टोकाचा प्रकार मानला जात आहे. शासनाने शालेय पोषण आहारासाठी काटेकोर नियमावली तयार केली असून प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांसाठी स्टीलच्या प्लेट उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या शाळेत स्टीलच्या प्लेटऐवजी रद्दी कागदावरच खिचडी वाढली जात असल्याचे दृश्य व्हिडिओत स्पष्ट दिसते. इतकेच नव्हे तर पोषण आहार घेत असताना विद्यार्थ्यांच्या सभोवती श्वान मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या आधीच घटत असताना अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला तडा जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना विचारणा केली असता “चार महिन्यांपूर्वीच सर्व शाळांना कडक आदेश दिले होते,” असे त्यांनी सांगितले. तरीही प्रत्यक्षात अनियमितता सुरूच असल्याने याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, संग्रामपूर गटशिक्षणाधिकारी दीपक टाले यांनी “केंद्रप्रमुखांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे, अहवालानंतर संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल,” असे सांगितले. या प्रकारामुळे शालेय शिक्षणमंत्री हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!