(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील दादा साहेब बाहेकर उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मोहम्मद यासिन यांचे सुपुत्र मोहम्मद यासीर याची शासकीय कोट्यातून निशुल्क एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने पातुर्डा ग्रामस्थ, स्थानिक उर्दू शाळा, जि.प. उर्दू उच्च प्राथमिक शाळा आणि दादासाहेब बाहेकर उर्दू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. हा छोटेखानी सत्कार समारंभ दादासाहेब बाहेकर उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात पार पडला. मोहम्मद यासीर यांचे माध्यमिक शिक्षण अमरावती येथील युनिक स्कूलमध्ये झाले. त्यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत १० हजार रँक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. शासकीय कोट्यातून त्यांची नागपूर GMC (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पात्रता ठरली आहे. अकोला येथील ललित ट्यूटोरियल कोचिंग क्लासेसमध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. या उज्ज्वल यशाबद्दल त्यांच्या वडिलांसह संपूर्ण कुटुंबाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास दादासाहेब बाहेकर उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक कलीम खान, जि.प. उर्दू उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मुश्ताक, तसेच शिक्षक शेख कय्यूम, आसिफुर्रहमान, शेख नसीम, शकील अहमद, अब्दुल करीम, शेख इम्रान, तौसिफ अहमद खान, सय्यद असलम, शेख फरजान आतिफ, शिक्षिका नाहिद अख्तर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय कर्मचारी जावेद इकबाल, इरफानुद्दीन काझी, शेख तुकडू यांनी परिश्रम घेतले. मोहम्मद यासीर याच्या यशामुळे पातुर्डा परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.