(मतीन शेख)
बुलडाणा: चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात घडलेल्या एका भयावह कौटुंबिक हत्याकांडाने परिसर हादरून गेला आहे. आई-वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्यानंतर मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना ५ नोव्हेंबरच्या रात्री घडली. या भीषण घटनेत सुभाष डीगंबर डुकरे (७५), लता सुभाष डुकरे (६५) आणि विशाल सुभाष डुकरे (४२) या तिघांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून घर सील करून पंचनामा करण्यात आला. मृतदेहांना चिखली उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक वाद की मानसिक नैराश्य, या दोन शक्यतांवरून पोलिसांचा तपास सुरू आहे. घटनेनंतर गावात हळहळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तसेच ठाणेदार भूषण गावंडे यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली.
सावरगाव डुकरे गावातील या हत्याकांडाने संपूर्ण चिखली तालुक्यात शोककळा पसरली असून गावात स्तब्धता पसरली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन चौहान करीत आहे.