Saturday, December 13, 2025
Homeनेशनल न्यूज़टूनकी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिकेचे उद्घाटन

टूनकी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिकेचे उद्घाटन

 

(मतीन शेख)

 

बुलढाणा: भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी होत असताना टूनकी बु. ग्रामपंचायतीने एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. टुनकी ग्रामपंचायत सरपंच सीमा वानखडे आणि शाहू-फुले-आंबेडकर वाचनालयाच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आली असून तिचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासासाठी आवश्यक असे साहित्य व वातावरण अपुरे असते. या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वानखडे यांच्या संकल्पनेतून आणि वाचनालय अध्यक्ष धर्मेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झालेली ही अभ्यासिका विद्यार्थीहितासाठी मोठी देणगी ठरणार आहे. या अभ्यासिकेत एकावेळी किमान १६ विद्यार्थी अभ्यास करू शकतील, अशी सुसज्ज बैठक व्यवस्था ग्रामपंचायतीने वाचनालयाच्या इमारतीत केली आहे. या आधी अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी खासगी खोली भाड्याने घेऊन अभ्यास करत असत. मात्र, योग्य वातावरण आणि सुविधा उपलब्ध नव्हत्या. या गरजेतून अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील, प्राध्यापक कौस्तुभ भोपळे आणि संभाजीनगर येथील प्रा. अवचार सर हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी ग्रामपंचायतच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास दशरथ लोणकर, रमेश लोणकर, आताउल्ला पठाण, विश्वास वरनकार, सुरेश लोणकर, गजानन विणकर (तंटामुक्ती अध्यक्ष), उपसरपंच वंदना झाल्टे, माजी सरपंच जीवन लोणकर, सुरेंद्र चौकट, तसेच वाचनालयाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका उभारण्याचाही संकल्प ग्रामपंचायतीकडून करण्यात आला, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मेंद्र इंगळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन राजेंद्र वानखडे यांनी केले. हा उपक्रम गावातील युवकांना अभ्यासासाठी प्रेरणा देणारा असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा एक विधायक प्रयत्न ठरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!