(मतीन शेख)
अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील जांबवाडी रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरीत महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहनासह ४ जणांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.१५ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, जामखेड जवळ असलेले जांबवाडीकडे एक महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहन येत होते. या वाहनात रामहरी गंगाधर शेळके (वय ४०), किशोर मोहन पवार (वय २५), अशोक विठ्ठल शेळके (वय ३५, सर्व रा. जांबवाडी, ता जामखेड), चक्रपाणी सुनिल बारस्कर (रा.जामखेड) आदींचा समावेश होता. दरम्यान अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट विहिरीत जाऊन पडले. वाहनात बसलेल्या त्या ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील मृतदेह नागरिक व तरुणांनी दोरीच्या सहाय्याने विहीर मधून बाहेर काढले. यावेळी ग्रामीण रूग्णालयात सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.