(मतीन शेख)
यवतमाळ: पोलिस दलातील लाचलुचपत प्रकरणे काही काळ शांत झाल्याचे चित्र निर्माण झाले असले, तरी भ्रष्टाचार अद्यापही लपूनछपून सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर यांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) पथकाने लाच स्वीकारताना गुरुवारी रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, रणधीर यांनी तक्रारदाराचे थकलेले पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात ५ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार गुरुवार दि .११ डिसेंबरला दाखल झाली होती. तक्रारदाराने आपल्या मित्राला मध्यस्थी करून दिलेले १० लाख रुपये परत न मिळाल्याने त्यांनी अवधूतवाडी ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर कथितरीत्या ठाणेदार रणधीर यांनी तक्रार मिटवून पैसे मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केली असल्याचा आरोप आहे. आज शुक्रवार दि.१२ डिसेंबर रोजी एसीबीने पडताळणी केली असता, रणधीर यांनी लाचेची मागणी ३ लाख रुपयांपर्यंत कमी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उभारण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान त्यांनी तक्रारदाराकडून १ लाख रुपये लाच म्हणून स्वीकारल्याचे एसीबीने सांगितले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून यवतमाळमधील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे यवतमाळ जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली असून नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याची माहिती मिळत आहे. सदर सापळा कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.नि. चित्रा मेसरे, पो.नि. स्वप्निल निराळे, पो.शि. शैलेश कडू, उपेंद्र थोरात, वैभव जायले तसेच चालक स.पो.उ.नि. सतीश किटूकले आणि पो.कॉ. राजेश बहिराट यांनी सहभाग घेतला.