(मतीन शेख)
स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथक पेट्रोलींगवर असताना त्यांना आज दि.५ डिसेंबर शनिवार रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेख तैसीफ शेख बुढण वय ३४, रा. इस्लामपूरा, अमडापूर, ता. चिखली हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तसेच आरोग्यास अपायकारक सुगंधित पानमसाला व गुटखा आपल्या ताब्यातील खोलीतून अवैधरीत्या विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार स्था.गु.शा. बुलढाणा पथकाने आरोपीच्या राहत्या घरावर कायदेशीर झडती घेतली. झडतीदरम्यान विविध कंपनींचा सुगंधित पानमसाला व गुटखा असा अंदाजे ९५ हजार ३९२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपी शेख तैसीफ यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाणे अमडापूर येथे अप. क्र. ३९५/२०२५ अंतर्गत कलम २२३, २७४,२७५,१२३ भादंवि सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६(२)(IV) व शिक्षापात्र कलम ५९(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर स्थानीय गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्या आदेशाने करण्यात आली. या पथकात पोउपनि. अविनाश जायभाये, पोना. सुनिल मिसाळ, अनंत फरताळे, पोकॉ. गणेश वाघ स्थानीय गुन्हे शाखा बुलढाणा यांनी विशेष परिश्रम घेऊन ही कारवाई यशस्वी केली.