(मतीन शेख)
बुलढाणा : शासनाने बंदी घातलेला आणि जीवितास घातक ठरणारा चायनीज मांजा विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या दोघांवर आज दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास सोनाळा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत करण्यात आलेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. पोहेकॉ विशाल गवई यांच्या फिर्यादीवरून दखलपात्र गुन्हा क्र.३१८ /२०२५ नोंदविण्यात आला. गौरव गजानन ढगे वय २३ आणि विक्रम महादेव ठाकरे वय २५ दोघेही रा.सोनाळा अशी आरोपीची नावे आहेत. कारवाई दरम्यान यांच्या दुकानावर पोलीस पथकाने छापा टाकला असता छाप्यात (मोनो केटीसी) कंपनीचा चायनिज नायलॉन मांजा असे एकूण ३० गोलाकार रिल मिळून आले, ज्याची किंमत सुमारे ६ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मांजाच्या वापरामुळे मनुष्यबळासोबतच पक्षी आणि निरपराध प्राण्यांचा जीव धोक्यात येतो. शासनाने कडक बंदी घातली असतानाही मांजा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला होता असे पोलिसांनी सांगितले. सदर कारवाई ठाणेदार सपोनि संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विशाल गवई, पोकॉ विनोद शिंबरे, वाहन चालक इमरान शेख यांनी केली असून पुढील तपास पोहेकॉ रमेश खरात करत आहेत. सोनाळा पोलिसांच्या या कारवाईमुळे गावात अवैध मांजा विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.