(मतीन शेख)
बुलढाणा : सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी आज दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी साधी सायकल हेरली आणि थेट सातपुड्याच्या पायथ्यावरील वसाळी गावात हजेरी लावली. गावातील रस्त्यांवरून फेरफटका मारताना त्यांनी नागरिकांशी मुक्तपणे संवाद साधला.
या भेटीदरम्यान ठाणेदार काळे म्हणाले, “गावातील लोकांशी प्रत्यक्ष भेट होणे गरजेचे आहे. त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि विश्वास वाढवण्यासाठी मी रोजच सायकलवरून गावात जातो. त्यामुळे माझे आरोग्यही चांगले राहते आणि नागरिकांशी जवळीकही वाढते.”
ठाणेदारांचा हा अनोखा उपक्रम गावकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. कर्तव्यनिष्ठ आणि तडफदार अधिकारी आपल्या गावात कार्यरत असल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे परिसरात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वासही ग्रामस्थांनी वर्तवला आहे.