(मतीन शेख)
बुलढाणा: सोनाळा परिसरात सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास सायकलवरून गावात फेरफटका मारणारा एक अनोळखी युवक दिसल्याने ग्रामस्थांनी उत्सुकतेपोटी त्याची चौकशी केली. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो युवक म्हणजे सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे असल्याचे समोर आले. नागरिकांनी त्यांच्याशी चर्चा केली. चर्चे दरम्यान ठाणेदार काळे यांनी सांगितले की, “लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या मन मोकळेपणाने जाणून घेण्यासाठी मी दररोज सायकलने गावात फेरफटका मारतो. यामुळे शारीरिक आरोग्य चांगले राखले जाते आणि नागरिकांशी सहज संपर्कही साधता येतो.” त्यांच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी मनापासून स्वागत केले आहे. कर्तव्यदक्ष, उमदे आणि तडफदार व्यक्तिमत्त्वाचे ठाणेदार सोनाळा पोलीस स्टेशनला लाभल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सकारात्मक बदल जाणवतील, असा विश्वासही वर्तवला जात आहे.