(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुका व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची बैठक वरवट बकाल येथे ९ डिसेंबर मंगळवार रोजी उत्साहात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील सर्व पत्रकार सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार पल्हाद दातार यांनी भूषविले.
बैठकीत संघटनेच्या धोरणात्मक कार्यपद्धती, संघटनात्मक बळकटी, तसेच तालुक्यातील पत्रकारांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेबद्दल पत्रकार नारायण सावतकार, पत्रकार सचिन पाटील व पत्रकार युसुफ शेख यांनी आपली मते मांडून संघटनेच्या कामकाजावर मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष नारायण सावतकार यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने स्वखुशीने पदाचा राजीनामा सादर केला. त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “व्हॉइस ऑफ मीडिया संघटना ही केवळ पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत आहे. मला तालुकाध्यक्ष पदाचा बहुमान आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या आशीर्वादामुळे मिळाला. वर्षभर आपण दिलेली साथ, विश्वास आणि सहकार्य मी कधीही विसरणार नाही. माझा कार्यकाळ संपल्याने मी पदाचा राजीनामा देत असलो तरी, पुढेही मी संघटनेसोबत सदैव कार्यरत राहणार आहे.” बैठकीचा समारोप सौहार्दपूर्ण वातावरणात झाला.
सर्व पत्रकारांनी सावतकार यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद दातार, नारायण सावतकार, मीर मकसुद अली, सचिन पाटील, दयालसिंग चव्हाण, नंदू शिरसोले, युसुफ शेख, रवी शिरस्कर, मतीन शेख, प्रभू पारसकर, सतीश वानखडे, कैलास खोट्टे, संतोष आगलावे, कैलास आकोटकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.