(मतीन शेख)
बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे शेताच्या रस्त्यावरून झालेल्या वादातून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना आज दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. या हल्ल्यात गणेश पाटील आणि त्यांची पत्नी प्रभा पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. फिर्यादी प्रभा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ७:४५ ते ८ वाजताच्या दरम्यान ते दोघेही बैलबंडी घेऊन शेताकडे जात असताना पंकज श्रीकृष्ण भगत वय ३०, रा. सुनगाव हा रस्त्यात कुऱ्हाड हातात घेऊन उभा होता. त्यांनी त्याला बाजूला व्हायला सांगितले असता अचानक पंकज भगत याने त्यांच्या बैलबंडीत उड्या मारल्या आणि दोघांनाही ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर, पाठीवर व छातीवर कुऱ्हाडीचे घाव केले. तसेच त्याचे वडील श्रीकृष्ण भगत वय अंदाजे ५० यांनी देखील पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर जखमी दोघांनाही तातडीने अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. प्रभा पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी पंकज भगत आणि श्रीकृष्ण भगत यांच्यावर कलम १०९(१),३५१(३), ३(५) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या आदेशानुसार सपोनि नागेश मोहोड हे करीत आहेत.