(मतीन शेख)
जळगाव जामोद: प्रशासनाची संवेदनशीलता आणि तत्परता याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे जळगाव जामोद तालुक्यातील पीक नुकसान पाहणीसाठी अवघ्या २४ तासांत घेतलेली कृती. समाधान दामधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार व कृषी विभागाने तत्काळ कार्यवाही करत, दि.१९ सप्टेंबर रोजी जामोद व सुनगाव मंडळातील विविध शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी मित्र आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. संत्रा बागांमध्ये झालेली फळगळ तसेच सोयाबीन पिकावरील व्हायरसचा परिणाम याचा सखोल अभ्यास करत नुकसानाचे निरीक्षण करण्यात आले. “प्रशासनाने वेळेवर दखल घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. आता केवळ अहवाल आणि पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे,” असे समाधान दामधर यांनी स्पष्ट केले. यावेळी कृषी तज्ञ दाते, कृषी विभागाचे काळे, कांचन पाटील मॅडम, गव्हाणे, समाधान दामधर, कृषी मित्र मोहनसिंग राजपूत, पुंडलिक पाटील, दिनेश ढगे, रामदास धुळे, राजाराम धुळे, रामेश्वर अंबडकर, रोशन धुर्डे समाधान धर्मे, संतोष ढगे, किसन ढगे, तुकाराम ढगे, गजानन ताडे, रमेश वंडाळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.