(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यातील शेगाव शहरात आदर्श रिसॉर्टवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री मोठी धाड टाकली. या कारवाईत तब्बल ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६१ जणांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री माहिती मिळाली की, शेगाव-खामगाव रोडवरील आदर्श रिसॉर्टवर काही जण मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत आहेत. तत्काळ डॉ. लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आणि रात्री ११.५० वाजता रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला.
पोलिसांना त्या ठिकाणी ६० आरोपी जुगार खेळताना आढळले. छाप्यातून नगदी १७ लाख ५२ हजार ३२० रुपये, १२ चारचाकी वाहने, ५ मोटारसायकली, तसेच ५२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या सर्व वस्तूंसह मुद्देमालाची एकूण किंमत ६२ लाख २ हजार ६४० रुपये इतकी आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, तसेच पोहेकॉ प्रभंजन जोशी, शिवशंकर वायाळ, बाळू डाबेराव, गोपाल सातव, शेख मुजीब, नितीन पाटील, संदिप गवई, अमरदीप ठाकूर, आशीष ठाकूर यांनी केली. या प्रकरणी पोस्टे शेगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. उपनिरीक्षक संदिप बारींगे हे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या आदेशानुसार करीत आहेत.