(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील वकाना येथे शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वकानाच्या अवघ्या १०० मीटर अंतरात दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ग्रामपंचायतीकडे आज दि.१७ फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेजवळ संशयास्पद हालचाली वाढल्या असून विद्यार्थ्यांसमोरच दारूची खरेदी-विक्री होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक वातावरण बिघडत असून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि सुरक्षेवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शासन नियमानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात मद्यविक्रीस सक्त मनाई असताना संबंधित ठिकाणी हा प्रकार सुरूच असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी व शाळा परिसर कायमस्वरूपी निर्व्यसनी घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या वेळी वैभव बनकर, सागर राऊत, पंकज खोटे, सागर राहाटे, आकाश राऊत, रोहित वानखडे, ओमप्रकाश बोंबटकार, संतोष वानखडे, वैभव बाजोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.