(मतीन शेख)
बुलढाणा: शेगाव तालुक्यातील आलसणा शिवारात आज गुरुवार दि.३० ऑक्टोबर दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला. रील बनवताना रेल्वेगाडीच्या धडकेत एक युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. मृत युवकाचे नाव शेख नदीम शेख रफीक (रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव) असे असून, जखमी युवकावर शेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख नदीम अळसणा गावात लग्न समारंभासाठी आला होता. दुपारी सुमारास ४:३० वाजताच्या दरम्यान तो आपल्या मित्रासोबत रेल्वे ट्रॅकजवळ रील शूट करण्यासाठी गेला होता. दोघांच्या कानात हेडफोन असल्याने येणाऱ्या रेल्वेगाडीचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. काही क्षणांतच येणाऱ्या ट्रेनखाली नदीमचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शेगाव येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे.