(मतीन शेख)
जळगाव खान्देश: जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे जवळ आज दि.२२ जानेवारी रोजी ४ ते ५ वाजताच्या सुमरास मोठा रेल्वे अपघात घडला आहे. कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती आहे. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस ही जळगावहून पाचोऱ्याकडे जात होती. एक्सप्रेस पाचोरा ते परधाडे दरम्यान आली असता कुणीतरी चैन ओळली. त्यामुळे पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा उडाल्याने रेल्वेतील प्रवाशांनी खाली उड्या मारल्या परंतु दुसऱ्या रेल्वे लाईनवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. या गाडीमुळे जवळपास ८ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारीही पोहचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.