(मतीन शेख)
अकोला: पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासोबत विजय सभागृह येथे आढावा बैठक घेतली. पवित्र रमजान महिना आणि आगामी शिवजयंती एकाच कालावधीत येत असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीत शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवणे, पोलीस बंदोबस्त मजबूत करणे तसेच विविध घटकांमध्ये समन्वय राखणे याबाबत चर्चा झाली. कोणत्याही प्रकारची गैरसमज, अफवा किंवा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश देण्यात आले. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना रात्री खरेदीसाठी आवश्यक परवानग्या सुलभ पद्धतीने देण्याची मागणी आमदार पठाण यांनी केली. दोन्ही धार्मिक सण शांततेत आणि उत्साहात पार पडावेत, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता आणि सतर्कतेने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले. बैठकीनंतर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस माजी नगरसेवक मो. इरफान, मो. युसुफ, मंजूर अहमद आदी उपस्थित होते.