(मतीन शेख)
बुलढाणा: धर्म, देश व मानवतेसाठी बलिदान देणाऱ्या चार साहेबजाद्यांच्या शहीद सप्ताहानिमित्त संग्रामपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२६ डिसेंबर रोजी संग्रामपूर पंचायत समिती चौक, श्री हनुमान मंदिरासमोर हे रक्तदान शिबिर होणार असून, शीख शिकलीकर मित्र मंडळ, वकील संघ संग्रामपूर, विश्व हिंदू परिषद–बजरंग दल व व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामागील मुख्य उद्देश सामाजिक बांधिलकी जपत मानवसेवेचा संदेश देणे हा असून, गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. संग्रामपूर तालुक्यातील युवक, सामाजिक संघटना, विविध समाजबांधव व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास ते उपयुक्त ठरते, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमातून शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोबिंदसिंह महाराज यांचे चार सुपुत्र—साहेबजादा अजितसिंह, साहेबजादा जुजारसिंह, साहेबजादा जोरावर सिंह आणि साहेबजादा फतेह सिंह— यांच्या शौर्य, त्याग व मानवतेच्या मूल्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. अल्पवयीन असूनही अन्याय, जुलूम व धर्मांतराच्या दबावासमोर न झुकता त्यांनी दाखवलेले अपूर्व धैर्य भारतीय इतिहासातील सुवर्णअध्याय मानले जाते. या पवित्र कार्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वकील संघाचे ॲड. गणेश क्षीरसागर, बजरंग दल जिल्हा संयोजक भारत बावसकर तसेच शीख शिकलीकर मित्र मंडळ व व्हॉईस ऑफ मीडिया कडून पत्रकार दयालसिंग चव्हाण यांनी केले आहे.