(मतीन शेख)
संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी सोनाळा पोलिसांचा ‘मिशन परिवर्तन’ उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे. टुनकी येथील आदिवासी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पोलीस भरती सराव लेखी परीक्षेत १६० युवक व ५० युवती सहभागी झाले.
सोनाळा ठाणेदार संदीप काळे यांनी परीक्षार्थींना भरतीसाठी आवश्यक तयारी, मार्गदर्शन आणि टिप्स दिल्या. परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देण्याचीही घोषणा त्यांनी केली. ठाणेदार काळे हे समाजकार्याशी संबंधित उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेतात. यापूर्वी त्यांनी सायकल वारीतून पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याबाबत जनजागृती केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासही त्यांनी महत्वाची पावले उचलली.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेत ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत २१० परीक्षार्थ्यांची पोलीस भरती लेखी सराव परीक्षा आयोजित केली गेली. पार पडलेल्या या परीक्षेचे पर्यवेक्षण शिक्षक संतोष दाभाडे आणि निलेश तायडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशासाठी पोलीस अंमलदार विनोद शिंबरे, मोहन पवार, नारायण खरात, विनोद वानखडे, विशाल गवई, गणेश मोरखडे, परमेश्वर तितरे आणि राहुल पवार आदींनी परिश्रम घेतले.
सोनाळा पोलिसांचा हा उपक्रम आदिवासी व ग्रामीण युवकांना खाकी पोशाखात देशसेवा करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला आहे.