(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील वानखेड फाटा येथील बाल शिवाजी इंग्लिश स्कूलचा इयत्ता सहावीतील विद्यार्थी मिर मुजाहीद अली मिर जावेद अली याने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावत संग्रामपूर तालुक्याचा मान उंचावला आहे. बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या आयोजनाखाली सरस्वती कॉलेज शेगाव येथे सब-ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर महिला-पुरुष गटांच्या स्पर्धा पार पडल्या. जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. १४ वर्षांखालील ३२ ते ३४ किलो वजनगटात मिर मुजाहीद अली याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. कठोर सराव, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने ही यशस्वी कामगिरी साध्य केली. या स्पर्धेत संग्रामपूर तालुक्याने एकूण १९ सुवर्ण व ५ रौप्य पदके जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. तालुक्याच्या या उल्लेखनीय यशात मिर मुजाहीद अलीचा मोलाचा वाटा राहिला. त्याच्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रविण पाटील, संचालक मंडळ व प्राचार्य प्रशांत गायकवाड यांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या यशाचे श्रेय मिर मुजाहीद अली याने प्राचार्य प्रशांत गायकवाड, उपप्राचार्य संदीप साळुंके, शिक्षक प्रथमेश ठाकरे, भूषण वानखडे, वैभव गाडगे, संग्रामपूर तालुका बॉक्सिंग प्रशिक्षक नागसेन इंगळे तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर मिळविलेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.