(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक समानता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सर्व धर्म-जातीय लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्यावर भर देत हा कार्यक्रम भव्यदिव्य वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शनिवार सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी ह.भ.प. बाळकृष्ण आमझरे महाराज यांनी “ग्रामगीता” या काव्यातून ग्रामसंस्कृती, आत्मसंयमन आणि व्यावहारिक शिक्षणाचे महत्त्व यावर प्रभावी विचार मांडले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कीर्तन आणि भजन या माध्यमांचा उपयोग करण्याचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हे जीवनावश्यक असून व्यावहारिक ज्ञानामुळेच व्यक्ती कर्तृत्ववान बनते व समाजातील गरजू लोकांना मदत करता येते, असेही त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले. या प्रचार कार्यक्रमाचा सप्ताहभर तालुक्यातील विविध गावांत विस्तार होणार असून, दर दिवशी भजन, कीर्तन, रामधून व ग्रामप्रदक्षिणा यांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार केला जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी चंदर्भान धुर्डे, रामदास महाले, समाधान डाबरे, पांडुरंग टाकळकर, काशीराम रोदळे, प्रल्हाद अस्वार, अरुण राठोड, रमेश रावणकर, गणेश रावणकार, मुगुटराव रावणकार, डॉ. चव्हाण साहेब, ईगळे गुरुजी आदी गुरुप्रेमी उपस्थित होते. भजन, कीर्तन व राष्ट्रसंतांच्या विचारांनी संपूर्ण वानखेड गाव भक्तीमय वातावरणाने भारून गेले. समाजातील समानता, शिक्षण व सेवा भाव यांचा संदेश देत या कार्यक्रमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना नवे बळ मिळाले.