(मतीन शेख)
बुलढाणा: मिशन परिवर्तन अंतर्गत अवैधरित्या अंमली पदार्थ धारणा करणाऱ्या एका व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले. दि.२३ नोव्हेंबर रोजी बुलढाणा उपविभागात पेट्रोलिंगदरम्यान जय हॉटेलजवळ गोंधनखेड शिवार पो. ठाणे बुलढाणा ग्रामीण येथे संशयित हालचाल करणारा एक इसम दिसून आला. त्याचे नाव गणेश मेरसिंग साबळे वय ४२, रा. तरोडा, तारापुर रोड, ता. मोताळा असून तो लाल रंगाच्या बजाज डिस्कव्हर मोटारसायकलच्या हॅन्डलला नायलॉन पिशवी लटकवून फिरत होता. संशयावरून त्याची आणि मोटारसायकलवरील नायलॉन पिशवीची पंचासमक्ष झडती घेण्यात आली. त्यामध्ये हिरवट-काळसर कळीदार असा २ किलो ५० ग्रॅम गांजा आढळून आला. त्याची बाजार भावानुसार किंमत ४१ हजार रुपये इतकी आहे. त्याचबरोबर आरोपीकडून जिओ कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे १ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली बजाज डिस्कव्हर मोटारसायकल एमएच २८ एके १८९१ किंमत १५ हजार असा एकूण ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नमूद आरोपीसह आणखी एका आरोपीविरोधात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये पोलीस ठाणे बुलढाणा ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, विजय पैठणे, पोना सुनील मिसाळ, अनंत फरताळे, पोकों गजानन गोरले, अमोल वानरे, चापोका निवृत्ती पुंड आणि रवि भिसे यांचा समावेश होता.