(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील रहिवासी अरुणा सुरेश कळमकार या महिलेने दि.२ जुलै रोजी गटविकास अधिकारी यांना असंख्य महिलांच्या उपस्थितीत निवेदन दिले होते. कवठळ येथील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी खोटे व बनावट ठराव दिल्याचा आरोप केला असून पदाचा गैर वापर करून सदस्याच्या सूनेची निवड करण्यात आली होती. ती चुकीची निवड रद्द करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली होती. तसेच २१ फेब्रुवारीला सुद्धा तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र आरोग्य विभागाने या निवेदनाला सुद्धा केराची टोपली दाखविल्याने पुन्हा मंगळवारी असंख्य महिला समवेत अरुणा कळमकार यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन चुकीची निवड रद्द करण्याची मागणी करीत त्या पदावर त्यांची स्वतःची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तातडीने मागणी पूर्ण न झाल्यास गावातील महिलांसह दि. १० जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा अरुणा कळमकार यांच्या कडून निवेदनातून देण्यात आला होता. निवेदनात दिलेला ८ दिवसाचा कालावधी समाप्त झाला असून त्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. म्हणून सांगितल्या प्रमाणे कवठल येथील रहिवासी अरुणा सुरेश कळमकार ह्या १० जुलै रोजी गावातील महिलांना घेऊन उपोषणास बसल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी संध्याकाळी गटविकास अधिकारी पायघन यांनी पत्र देऊन दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्या उपोषण कर्त्या महिला अरुणा कळमकार यांना दिली होती. त्या वरून उपोषणाची सांगता करण्यात आली होती. परंतु दिलेल्या पत्रानुसार आता पर्यत १५ दिवस उलटून सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नसून अरुणा कळमकार यांनी २४ जुलै रोजी निवेदन देऊन पुन्हा ५ ऑगस्ट रोजी उपोषणास बसण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना देण्यात आला आहे.