(मतीन शेख)
बुलढाणा: सोनाळा पोलीस ठाण्यात अधिकारी फेरबदल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे हे नवीन ठाणेदार म्हणून पदभार सांभाळणार आहेत. ते यापूर्वी मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी सोनाळा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, आतापर्यंत सोनाळा पोलीस ठाण्याचे नेतृत्व करणारे सपोनि चंद्रकांत पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तब्बल १५ पिस्तुल जप्त करून उल्लेखनीय कामगिरी बजावली. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणत परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पाटील यांनी केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले नाही, तर नागरिकांशी संवाद वाढवून पोलीस-जनता विश्वासाचे नाते अधिक दृढ केले. त्यांनी अनेक सामाजिक आणि जनजागृती उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. युवकांमध्ये कायद्याबद्दल आदर आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करत प्रेरणादायी नेतृत्व देणारे अधिकारी म्हणून पाटील यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या काटेकोर कारभारामुळे सोनाळा पोलीस ठाण्याची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली.
सोनाळा परिसरातील नागरिक तसेच स्थानिक प्रशासनाकडून चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. आता नव्या ठाणेदार म्हणून संदीप काळे यांच्याकडून परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी आणखी प्रभावी कारभाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.