(मतीन शेख)
अकोला: पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थापना शाखेत कार्यरत वरिष्ठ लिपिक श्रीमती ममता संजय पाटील वय 50 यांना ८ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावतीच्या पथकाने गुरुवार दि.६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धान्य खरेदी–विक्री व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांच्या विरोधात झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने आरोपीला मदत केल्याचा आरोप करत तक्रारदाराने पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरील अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी श्रीमती पाटील यांनी २० हजार रुपयाची लाच मागितली त्यातील पहिला हप्ता म्हणून ८ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावतीच्या पथकाने गुरुवारी सायं. ६ ते ६:४० या वेळेत अकोला पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थापना विभागाजवळील जिन्याजवळ सापळा रचला.
त्यात पंचांच्या उपस्थितीत श्रीमती पाटील यांनी ८ हजार रुपये लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई परिक्षेत्रीय पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे व पोलिस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संपूर्ण सापळा कारवाई पोलिस निरीक्षक श्रीमती चित्रा मेसरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलिस हवालदार राहुल वंजारी, प्रमोद रायपुरे, तसेच पो. कॉ. शैलेश कडू व पो. उपनि. सतीश किटुकले यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.