(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील रहिवासी अरुणा सुरेश कळमकार या महिलेने आज दि.२ जुलै रोजी गटविकास अधिकारी यांना असंख्य महिलांच्या उपस्थितीत निवेदन दिले. सविस्तर वृत्त अशे की, कवठळ येथील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी खोटे व बनावट ठराव दिल्याचा आरोप केला. पदाचा गैर वापर करून सदस्याच्या सूनेची निवड करण्यात आली असून चुकीची निवड रद्द करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तत्पूर्वी २१ फेब्रुवारीला तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन चुकीची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आरोग्य विभागाकडून याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान कवठळ येथे तत्कालीन आशा सेविकेकडून गावाला सेवा मिळत नसल्याचे तक्रारी वाढल्या होत्या. ग्रामपंचायत ने ठराव घेऊन तत्कालीन आशा सेविकेला सेवेतून कमी केले. रिक्त झालेली जागा भरण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावानुसार ग्रामपंचायतीने आदेश काढला. या पदासाठी असंख्य इच्छुक महिलांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर केले. आशा सेविकेची निवड करण्यासाठी २० डिसेंबर २०२३ ला मासिक व ग्रामसभेचे आयोजन केले होते. मात्र ती सभा रद्द करण्यात आली. मात्र २० फेब्रुवारी २०२४ ला या आशा सेविका बाबतचा ठराव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला. हा ठरावं खोटा व बेकायदेशीर म्हणत ठरावावर इच्छुक अरुणा कळमकार यांनी आक्षेप घेत २१ फेब्रुवारीला आरोग्य विभागाकडे निवेदन देऊन सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी खोटे व बनावट ठराव दिल्याचा आरोप करीत चूकीच्या निवडीचा ठराव रद्द करून सखोल चौकशीची मागणी केली होती. मात्र आरोग्य विभागाने या निवेदनाला केराची टोपली दाखविल्याने पुन्हा मंगळवारी असंख्य महिला समवेत अरुणा कळमकार यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन चुकीची निवड रद्द करण्याची मागणी करीत त्या पदावर त्यांची स्वतःची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तातडीने मागणी पूर्ण न झाल्यास गावातील महिलांसह दि.१० जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा अरुणा कळमकार यांच्या कडून निवेदनातून देण्यात आला आहे.