(मतीन शेख)
नांदुरा : स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणी अहवालात त्रुटी नसतानाही अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि दुकानाचा धान्य पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी १६ हजारांची लाच मागणाऱ्या नांदुरा तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी पूनम थोरात यांना एसीबीने अटक केली. १४ नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालय परिसरातच ही कारवाई करण्यात आली असून, या घडामोडीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या चुलत्यांच्या नावावर स्वस्त धान्य दुकान असून, ते प्रत्यक्षात तक्रारदारच चालवत होते. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुकानाची नियमित तपासणी झाली होती. तपासणीत एकही त्रुटी आढळून न आल्याने अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात पाठवण्यात कोणतीही अडचण नव्हती. तरीदेखील, हा अहवाल अनुकूल पद्धतीने पुढे पाठवण्यासाठी तसेच धान्य पुरवठा न थांबवता सुरू ठेवण्यासाठी पुनम थोरात यांनी १६,००० रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी करताना लाच मागणीची खात्री पटल्यानंतर एसीबीने जाळे टाकले. नांदुरा तहसिल कार्यालयातील दालनातच तक्रारदाराकडून १६ हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने थोरात यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. ही कारवाई एसीबी अमरावतीचे पोलिस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणा विभागाचे पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पीआय रमेश पवार, पोहेकॉ प्रविण बैरागी, अमोल झिने, पोना जगदीश पवार, पोकॉ रंजीत व्यवहारे, मपोकॉ स्वाती वाणी, चापोहेका नितीन शेटे आणि एसीबी बुलढाणा पथकाचा सक्रिय सहभाग होता.