(मतीन शेख)
अमरावती: दर्यापूर-अकोला मार्गावर दोन चारचाकी कारची आज दि.२ डिसेंबर रोजी समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर तिन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर – अकोला मार्गावर आज दुपारच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. गोळेगाव लातूरच्या जवळ दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातामध्ये एका कारमधील आनंद बाहकर (२६ वर्षे रा. सांग्लुडकर नगर), बंटी बिजवे (३८ वर्षे रा. गजानन मंदिर साईनगर), प्रतीक बोचे (३५ वर्षे रा. सांग्लुडकर नगर) या तिघांचा मृत्यू झाला. तर कार मधील चौथा पप्पू घाणीवाले जखमी झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल हे दोघे जण जखमी झाले आहेत. आनंद, बंटी, प्रतिक आणि पप्पू हे चौघे कारने अकोल्याला जात होते. तर विरुद्ध दिशेने आकाश आणि रमेश अकोल्यावरून दर्यापूरकडे जात होते. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही कारची समोर धडक झाली.या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी येवदा पोलिसांनी धाव घेतली असून अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर मृतकांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. एका जखमीवर दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल या पितापुत्रांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.