(मतीन शेख)
बुलढाणा: सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या संत नगरी सोनाळा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ तसेच देशसेवा बजावलेल्या सैनिक व पत्रकारांचा सत्कार सोहळा १३ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद दातार, प्रल्हाद सावतकार, सोनाळा येथील सरपंच हर्षल खंडेलवाल, केंद्रप्रमुख भीमराव वानखडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश वानखडे होते. समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व जिजाबाई तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगमनाच्या नाट्यरूप सादरीकरणाने करण्यात आली. लोकनृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीतांसह महापुरुषांच्या वेशभूषा सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थिनींनी सादर केलेले सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यात आला.या शैक्षणिक, क्रीडा व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच २३ वर्षे देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले अनिल भाऊ वानखडे यांचा ‘भारत माता की जय’च्या घोषणेत सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे प्रल्हाद दातार यांनी आपल्या भाषणात वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक गजानन नेमाडे यांनी उपस्थित मान्यवर, पत्रकार, देशसेवक, शाळा समिती सदस्य व पालकांचे आभार मानले. सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण व सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्नेहसंमेलन अविस्मरणीय ठरल्याचे अध्यक्ष सतीश वानखडे यांनी सांगितले. कार्यक्रमास पत्रकार प्रल्हाद सावतकार, अशोक अकोटकर, मतीन शेख, कैलास खोट्टे, शेख रफिक, डॉ. दाभाडे, सुनील बावणे तसेच गावातील पालकवर्ग व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.