(मतीन शेख)
बुलढाणा: अंबाबरवा पुनर्वसन प्रकरणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून, या उपोषणाला आता दोन दिवस पूर्ण झाले आहेत. संग्रामपूर तालुक्यातील वसाळी येथील राजेश गेरसिंग मोरे आणि सचिन लक्ष्मण मुजलदा हे उपोषणकर्ते मागील दोन दिवसांपासून अन्नत्याग करून आंदोलन करत आहेत. प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उपोषणकर्त्यांना कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. नमुना आठ अंतर्गत मंजूर निधीची तात्काळ वितरण प्रक्रिया सुरू करावी, १८ वर्षांवरील लाभार्थ्यांची पात्रता यादी तयार करून त्यांना लाभ दिला जावा, २०१८ च्या शासन निर्णयानुसार जमीन वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी या मागण्या आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांशी संबंधित असून शासनाने त्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली आहे.
“आम्ही आमच्या समाजाच्या हक्कांसाठी लढत आहोत. पुनर्वसन प्रक्रियेत अन्याय सहन करणाऱ्या नागरिकांना न्याय मिळावा, हीच आमची भूमिका आहे. प्रशासनाने आम्हाला जागेवरून हटवले, तरी आम्ही मागे हटणार नाही.”—– राजेश मोरे
“दोन दिवस झाले, आम्ही उपोषणावर आहोत, पण अद्याप एकही अधिकारी आमच्याशी संवाद साधायला आलेला नाही. ही उपेक्षा आम्हाला असह्य आहे.” या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी संघटनांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणकर्त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्थानिक डॉक्टरांनी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.——— सचिन मुजलदा
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. उपोषणकर्त्यांनी त्यांचा उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.