(मतीन शेख)
बालापूर तालुक्यातील उरल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातरूण गावात रात्री उशिरा चार्जिंगला लावलेल्या गाडीला अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून, मालकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, काजीपूरा येथील काजी शाह खालिद खान उर्फ काजी रफत खान यांनी सुमारे एक वर्षांपूर्वी डाबकी रोडवरील एका शोरूममधून हिंदुस्तान पावर कंपनीची चार्जिंग गाडी खरेदी केली होती. घटनादिवशी त्यांच्या मुलाने नेहमीप्रमाणे रात्री सुमारे बारा वाजता गाडी चार्जिंगला लावून झोप घेतली होती.
त्यानंतर पहाटे तीन वाजताच्या सुमारास जोराचा आवाज झाल्याने काजी मेहंदी हसन यांची झोप उडाली. बाहेर येऊन पाहिले असता गाडीला प्रचंड आग लागली होती. त्यांनी तत्काळ आपल्या धाकट्या भावाला आणि पुतण्याला जागे करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
गाडी चार्जिंगला लावण्याच्या ठिकाणी नेहमीच गुरेढोरे बांधलेली असतात, मात्र थंडीमुळे त्या रात्री तेथे कुठलेही जनावर नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळाली आहे. या आगीचे कारण गाडीच्या बॅटरीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहेत. गाडी आणि बॅटरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.