(मतीन शेख)
खामगाव : शहरातील सजनपुरी नाक्यावर असलेल्या हॉटेल जुगनू येथे मंगळवारी दि.२३ सप्टेंबर सायंकाळी सुमारे ८ वाजता एका प्रेमी युगलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, ही घटना आत्महत्या आहे की खून, याबाबत संशयाचे सावट कायम आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत युवक व युवती हे साखरखेर्डा गावचे रहिवासी असल्याचे समजते. युवकाचे नाव साहिल उर्फ सोनू राजपूत वय अंदाजे २५ वर्षे तर युवतीचे नाव पायल पवार वय सुमारे २२ वर्षे असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर हॉटेल परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले असून, त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा सुरू केला आहे. पोलिसांकडून हॉटेल व्यवस्थापनासह इतर साक्षीदारांची चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, हॉटेलमध्ये आढळलेली वस्तू व पुरावे यांचाही बारकाईने तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच यामागील सत्य उघडकीस येईल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.