(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यात अपघाताची संख्या वाढली असून काल दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी अंदाजे ७ वाजताच्या सुमारास खामगावहून माटरगावकडे जात असलेला प्रवासी ऑटो क्र. एमएच २७ बी.डब्लू २८१८ अचानक बैलगाडीला धडकला. या भीषण अपघातात एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शेख रहीम शेख इस्माइल वय १६ अशे मृतकाचे नाव असून तो माटरगाव ता. शेगाव येथील रहिवासी आहे. अपघात इतका भीषण होता की, शेख रहीम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींमध्ये शेख फहिम शेख नबी वय ४८ यांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आणखी एका युवकाचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातानंतर परिसरात आणि संबंधित कुटुंबात शोककळा पसरली आहे. मृतदेह खामगाव सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेमुळे माटरगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.