(मतीन शेख)
जालना : जिल्ह्यातल्या राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ आज दि.१८ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमरास एक काळीज पिवळून टाकणारी धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार, आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दरम्यान विठू माऊलीचे दर्शन घेऊन काही वारकरी पंढरपूर वरून घरी जाण्यास निघाले. काही वारकरी पंढरपूर येथून जालण्यात दाखल झाले. राजूर जाण्यासाठी तब्बल त्या खाजगी काळी-पिवळी वाहनामध्ये अंदाजे १२ प्रवाशी बसले. दरम्यान राजूर मार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळ वसंत नगर शिवारात दोनचाकी वाहनाला वाचवण्याच्या नादात काळी-पिवळीच्या चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन थेट रस्त्याच्या पलीकडे असलेल्या विहिरीमध्ये जाऊन कोसळले. यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतकरी व कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. विहीरीत पडलेल्या भाविकांना सायंकाळ पर्यंत काढण्यासाठी प्रयत्न केले. काही भाविकांचा जीव वाचवण्यात यश सुद्धा आले आहे. तर जखमींना जालना शासकीय रुग्णालय जालना येथे हलवण्यात आले आहे. या घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रल्हाद महाजन, ताराबाई मालुसरे, नंदा तायडे, प्रल्हाद बिटले, नारायण किसन निहाळ, चंद्रभागा घुगे अशी या मृतकांची नावे समोर आली आहे. मृतकांमध्ये चनेगाव व तुपेवाडी या ठिकाणचे रहिवासी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्माचारी दाखल झाले आहे.