(मतीन शेख)
अकोला : मौजे कारंजा (रमजानपूर) व नवीन अंदुरा या गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आहेत. कारंजा नवीन अंदुरा लघुपाटबंधारे विभाग अकोला यांनी पानसाख नदीवर कारंजा येथे धरणाचे बांधकाम केले आहे. त्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे सर्व जुने वहिवाटीत पूर्व पश्चिम दिशेला असलेले शेत रस्ते पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ते बंद झाले आहे. शेतीची मशागत, पीक जमा करणे, त्यांची देखभाल करणे आधी करता प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. परंतु शेत रस्ते पाण्यात असल्याने शेतकऱ्यांना ये-जा करता येत नाही. या साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी मागील वर्षी १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना शेतात ये-जा करण्यासाठी नवीन शेतरस्ते मिळण्यासाठी निवेदन सुद्धा दिले आहे. परंतु शासन व प्रशासन यांच्याकडून काहीच दखल घेण्यात आली नाही असा आरोप शेतकरी करीत आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती आणि त्यांच्या शेतात रस्ता नसल्यामुळे काढणीनंतर सोयाबीन पीक तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात ढीग लावला आहे. मात्र त्या सोयाबीनच्या ढीगमध्ये मोठ्या प्रमाणात मुंगुस, सर्प माकड दिसून येत आहेत. ही समस्या खासदार व आमदार यांना सांगितली मात्र आजपर्यंत अधिकारी कर्मचारी बैठकीपर्यंत न आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.