(मतीन शेख)
बुलढाणा : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी बुलढाणा जिल्हा परिषदेकडून दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांच्या अधिनस्त ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) यांनी बांधकाम कामगारांनी सादर केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून मागील १२ महिन्यांतील ९० दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र शासन नियमानुसार देऊन त्यावर स्वाक्षरी करावी.
हे प्रमाणपत्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत कामगारांच्या नोंदणीसाठी आवश्यक असून, नोंदणी झालेल्या कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे की, प्रमाणपत्र देण्यास अथवा स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
ही कार्यवाही आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर करण्यात आल्याचे समजते.