(मतीन शेख)
नवी दिल्ली: कर्नाटकातील हासन जिल्ह्यात पहिली पोस्टींग घेण्यासाठी गेलेले २६ वर्षीय आयपीएस अधिकारी हर्ष बर्धन यांचा अपघातात मृत्यू झाला. हर्ष बर्धन हे कर्नाटक केडरचे २०२३ बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील रहिवासी होते. हासन जिल्ह्यातील किट्टाने जवळ आयपीएस अधिकाऱ्याच्या कारचा टायर फुटला, त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर आणि झाडावर चारचाकी वाहन जाऊन आदळले. दि.१ डिसेंबर रविवारी रोजी संध्याकाळी हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, हर्ष बर्धन हे होलेनरासीपूर येथे प्रोबेशनरी असिस्टंट पोलिस अधीक्षक म्हणून ड्युटीसाठी हासन येथे जात होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बर्धनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, आयपीएस अधिकाऱ्याने अलीकडेच म्हैसूर येथील कर्नाटक पोलिस अकॅडमीमध्ये चार आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि हासन जिल्ह्यात एएसपी म्हणून नियुक्ती केली होती. त्याचे वडील उपविभागीय दंडाधिकारी आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.